Josué 2

marc (MARC)

1 त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.

2 तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”

3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”

4 परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते.

5 संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.”

6 परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्‍याखाली लपविले होते.

7 तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.

8 रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली

9 आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.

10 कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.

11 जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.

12 “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,

13 की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”

14 “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”

15 तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते.

16 ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्‍यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”

19 जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.

20 परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”

21 “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.”

22 जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्‍यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले.

23 नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.

24 ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.