2 Reis 16

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 इस्राएलचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह याच्या सतराव्या वर्षी, योथामाचा मुलगा आहाज यहूदावर राज्य करू लागला.

2 आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये वाईट म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करत नसे.

3 त्याऐवजी तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गात चालला. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांपुढून घालवली होती, त्यांच्या तिरस्करणीय कर्मांस अनुसरून त्याने आपल्या मुलाचे अग्नीतून अर्पण केले

4 तो उंचस्थळी, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळत असे.

5 अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरूशलेमेवर स्वारी करून आले. आणि त्यांनी आहाजला घेरले, पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.

6 अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहूद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.

7 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास व तुझा मुलगा आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करून आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला वर ये आणि मला वाचव.”

8 आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.

9 तेव्हा अश्शूरच्या राजाने आहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकांस त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले.

10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेव्हा तेथील वेदी त्याने पाहिली आणि तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.

11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.

12 मग राजा दिमिष्काहून आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर यज्ञ अर्पण केला.

13 त्या वेदीवर त्याने होमार्पण आणि अन्नार्पण केले. त्याचे पेयार्पण ओतले तसेच शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले.

14 जी पितळी वेदी परमेश्वराच्या समोर होती, ती त्याने आपली वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामधून, काढली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.

15 मग राजा आहाजाने उरीया याजकाला आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, देशातील सर्व लोकांचे होमार्पण व त्यांचे अन्नार्पण व त्यांची पेयार्पणे, राजाचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझ्यासाठी असावी.”

16 उरीया याजकाने आहाज राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.

17 मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि गंगाळ काढले आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.

18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशही त्याने अश्शूरच्या राजासाठी परमेश्वराच्या मंदिरापासून फिरवला.

19 यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.

20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दाविदाच्या नगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.