2 Reis 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राज्य करू लागला.

2 अजऱ्या राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. आणि त्याने यरूशलेमामध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या असून ती यरूशलेमेतील होती.

3 अजऱ्याचे वर्तन आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडिल अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.

4 उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत, त्याठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.

5 परमेश्वराने राजाला दु:ख दिले आणि अजऱ्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.

6 अजऱ्याच्या राहिलेल्या गोष्टी, आणि त्याने जे केले, ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?

7 आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.

8 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.

9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.

10 मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.

11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.

12 अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.

13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा, यहूदाचा राजा उज्जीया याचे एकोणचाळीसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात एक महिना राज्य केले.

14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून वर शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा मुलगा शल्लूम याला मारून ठार केले आणि स्वत: त्याच्या जागेवर राजा झाला.

15 आणि शल्लूमच्या राहिलेल्या गोष्टी, त्याने केलेला कट, हे सर्व इस्राएल राजाच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले आहे.

16 मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.

17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनाच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.

18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली, त्यापासून तो फिरला नाही.

19 अश्शूरचा राजा पूल देशावर आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे, या इराद्याने मनहेमने पूलला हजार किक्कार चांदी दिली.

20 हा पैसा उभा करायला मनहेमने इस्राएलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला पन्नास शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.

21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नाही काय?

22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांसोबत झोपी गेला. त्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.

23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.

24 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध:पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.

25 रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आपल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरुध्द कट करून त्यास शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.

26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

27 रमाल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले.

28 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध:पात झाला, त्या पापांपासून तो फिरला नाही.

29 पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.

30 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी, एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला.

31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

32 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया याचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला.

33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकाची मुलगी यरुशा ही त्याची आई.

34 आपले वडिल उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.

35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने एक वरचा दरवाजा बांधला.

36 यहूदाच्या राजाचा इतिहास, या पुस्तकात योथामाने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.

37 अरामाचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्युक्त केले.

38 योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्यास पुरले. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.