Juízes 10

marc (MARC)

1 अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे.

2 तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.

3 त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

4 त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.

5 याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.

6 इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.

7 यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले.

8 ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला.

9 तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते.

10 तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”

11 याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी,

12 सीदोनी, अमालेकी व माओनी या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय?

13 परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही.

14 जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!”

15 परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

16 नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.

17 जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला.

18 गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्‍या सर्वांचा प्रमुख होईल.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.