Josué 14

marc (MARC)

1 एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

2 याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.

3 अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

4 योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.

5 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली.

6 यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.

7 जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले,

8 परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले,

9 म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’

10 “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे!

11 मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे.

12 म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.”

13 तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.

14 म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले.

15 (त्यापूर्वी हेब्रोनचे नाव किर्याथ-अर्बा असे होते, कारण अर्बा अनाकी लोकातील सर्वात महान व्यक्ती होता.)

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.