Jeremias 36

marc (MARC)

1 योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:

2 “तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही.

3 जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”

4 तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले.

5 मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही.

6 म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.

7 कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”

8 यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली.

9 योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

10 शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

11 शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

12 तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते.

13 नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.

14 तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला.

15 ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.”

16 जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.”

17 त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?”

18 त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.”

19 अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.”

20 नंतर अधिकार्‍यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली.

21 मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले.

22 हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.

23 यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले.

24 राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही.

25 त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही.

26 याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.

27 राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:

28 “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.

29 याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”

30 म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.

31 मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ”

32 मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 36, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.