2 Reis 25

marc (MARC)

1 म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.

2 सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.

3 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.

4 तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळ काढला,

5 परंतु बाबेलच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते,

6 आणि तो पकडला गेला.

7 त्यांनी सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या पुत्रांचा वध केला. मग त्यांनी त्याचे डोळे काढले व त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले.

8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

9 त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली.

10 रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली.

11 नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले.

12 परंतु अधिकार्‍याने देशातील काही अत्यंत गरीब लोकांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.

13 बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि ते कास्य बाबेलास घेऊन गेले.

14 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली.

15 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते, काढून घेतली.

16 याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

17 प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. एका खांबावर कास्याचा कळस होता जो तीन हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. नक्षीसह दुसरा खांबही तसाच होता.

18 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले.

19 जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि पाच राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने नेले.

20 रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.

21 हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला.

22 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने शाफानचा पुत्र अहीकामचा पुत्र गदल्याहला, यहूदीयाहमध्ये उरलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त केले.

23 जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

24 त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी गदल्याहने शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांना भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा आणि तुमचे बरे होईल.”

25 परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.

26 मग सेनाधिकार्‍यांसह, लहानमोठे सर्व लोक खास्द्यांच्या भीतीने इजिप्तला पळून गेले.

27 यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले.

28 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबेल येथे होते, त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.

29 यहोयाखीनने तुरुंगातील कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.

30 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 25, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.