Eclesiastes 3

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.

2 जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते.

3 ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते.

4 रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते.

5 धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते.

6 गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते.

7 वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते.

8 प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.

9 काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभ मिळतो?

10 देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.

11 देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही.

12 त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले.

13 आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे.

14 देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कमीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे.

15 जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते.

16 आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले तर तेथे दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते.

17 मी आपल्या मनात म्हटले, देव प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक कामाचा योग्यसमयी सदाचरणी आणि दुष्ट लोकांचा न्याय करील.

18 मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे.

19 जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशू मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय?

20 सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात.

21 मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे?

22 मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Eclesiastes 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.